विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा लिंब लोन करा सावळ्याला ||धृ|| दूरच्या भेटीला बहु आवडीचा जीवन सरिता नारायण ||१|| सर्व माझे गोत्र, मिळाले पंढरी मी माझ्या माहेरी धन्य झालो ||२|| तुका म्हणे माझा आला सखा हरी संकट निवारी पांडुरंग ||३||
रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी || १ || तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा || २ || बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी || ३ || सर्व सुखांचे आगर बाप रखुमादेवी वर || ४ ||
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी ... पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी ... माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी ... एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी ...
पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा || धृ || पंचतत्वाचा कागद केला विठुनामाची चौकट त्याला || १ || शाही शास्त्रांचा सुटला वारा चारी वेदांचा आधार त्याला || २ || तुका म्हणे मी झालो पतंग अवघा धागा विठू पांडुरंग || ३ ||